MSRTC recruitment
पुणे : एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून, चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन. 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणार्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकार्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307 व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
तसेच प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचार्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल, त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.