पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात महानगरपालिकेने वीजबिल न भरल्याने विद्यार्थ्यांवर अंधारात आणि पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. नवी पेठेतील पुणे धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयात (शाळा क्रमांक 17) ही लाजिरवाणी घटना घडली आहे. शाळेचे तब्बल 2 लाख 53 हजार 480 रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने 13 ऑगस्टपासून शाळेची वीज तोडण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये अंधारात व घुसमटीच्या वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे. हे बिल तातडीने भरून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केली. (Pune Latest News)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या शाळेची पाहणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड आला. त्यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली. या वेळी शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, काँग्रेसचे सागर धाडवे, शिवसेना प्रभागप्रमुख संजय साळवी आणि संघटक नीलेश वाघमारे उपस्थित होते.
अनंत घरत म्हणाले, ‘विद्येच्या माहेरघरात मुले अंधारात शिकताहेत, ही प्रशासनाच्या भ—ष्टाचाराची आणि निष्क्रियतेची परिसीमा आहे. पत्र्याच्या शेडमध्ये ना पंखा आणि ना उजेड, अशा अवस्थेत विद्यार्थी शाळेत शिकताहेत. शाळेचे वरचे दोन मजले धोकादायक ठरविण्यात आलेत, त्यामुळे खालच्या हॉलमध्ये पत्र्याचे शेड टाकून वर्ग भरविले जात आहेत. मात्र, धोकादायक मजल्यांवरच सुशोभीकरण करून अनधिकृत अभ्यासिका उभारली गेली आहे.