पुणे : शहरातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर रविवारी रात्री उशिरा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तपास समितीची घोषणा करण्यात आली असून या समितीत आक्रमक आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अवघ्या दोन महिन्यांत संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास करून अहवाल सादर करणार आहे. तसेच, हीच समिती ‘एमपीएससी’ आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत तपास करून शिफारस करणार आहे. यानंतर पुण्याच्या एस. एम. जोशी पुलावर हजारो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात आंदोलनाची सांगता झाली.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत सरकार आणि प्रशासनाचेही आभार मानले. सहकार्याची भूमिका घेणाऱ्या पोलिस प्रशासनाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचेही रोहित पवार यांनी पोस्टमधून आभार मानले.
विवेक भीमनवार अखेर रजेवर
‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार कथित पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रजेवर जाणार आहेत. भीमनवार म्हणाले, ‘मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता, या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.’