MPSC Exam Pudhari Photo
पुणे

MPSC State Service Main Exam: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली

उमेदवारांच्या मागणीनंतर वेळापत्रकात बदल; परीक्षा आता 5 एप्रिल ते 2 मेदरम्यान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून 27 फेबुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा - 2025 आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 29 मार्च ते 26 एप्रिलदरम्यान घेण्यात येणार होती. परंतु काही उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी संबंधित परीक्षा पुढे ढकण्याबाबत आयोगाकडे विनंती केली होती. उमेदवारांच्या विनंतीचा विचार करून आयोगाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा आता 5 एप्रिल ते 2 मेदरम्यान होणार आहे. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी 14 मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

आयोगातर्फे गेल्या वर्षी मार्च महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर या वर्षी 8 जानेवारी व 20 फेबुवारीला शुद्धिपत्रके प्रसिद्ध करत वाढीव पदांचा समावेश केला. त्यानुसार आता एकूण 139 पदांच्या भरतीसाठी परीक्षा प्रक्रिया राबविली जात आहे. निवडप्रक्रियेच्या पुढील टप्प्यात पूर्वपरीक्षेमध्ये अर्हतापात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 चे आयोजन केले आहे. 5 एप्रिल ते 2 मे या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील नाशिक, पुण्यासह अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नवी मुंबई या शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

यापूर्वी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांवर आधारित परीक्षा घेतली जात होती. परंतु या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करताना आता वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेत यश मिळविताना उमेदवारांचा कस लागणार आहे. भाषा पेपर-एक आणि भाषा पेपर-दोन, प्रत्येकी तीनशे गुणांचे असतील. 25 टक्के गुणांसह अर्हता ग््रााह्य धरली जाईल. गुणवत्तेसाठी गणना करण्यासाठी एकूण एक हजार 750 गुणांच्या पेपर क्रमांक तीन ते नऊचे मूल्यमापन केले जाईल. मुलाखतीसाठी 275 गुण असतील.

पेपर क्रमांक तीन ते सातसाठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग््राजी यांपैकी कुठल्याही एका भाषेत लिहिण्याचा पर्याय असेल. परंतु पाचही पेपर कुठल्याही एकाच भाषेत सोडविणे आवश्यक असतील. पूर्वपरीक्षेच्या अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमातून लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक

05 एप्रिल : भाषा (पेपर एक) आणि भाषा (पेपर दोन)

18 एप्रिल : निबंध (पेपर तीन)

19 एप्रिल : सामान्य अध्ययन-1 (पेपर चार) व सामान्य अध्ययन-2 (पेपर पाच)

26 एप्रिल : सामान्य अध्ययन-3 (पेपर सहा) व सामान्य अध्ययन-4 (पेपर सात)

02 मे : वैकल्पिक विषय (पेपर आठ), वैकल्पिक विषय (पेपर नऊ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT