Pudhari Photo
पुणे

MPSC Big Decision : ‘एमपीएससी’कडून ‘ऑप्टिंग आऊट’चा पर्याय बंद, गैरवापर झाल्याच्या चर्चेनंतर मोठा निर्णय

पर्यायाचा गैरवापर झाल्यामुळे पर्यायच बंद करण्याची वेळ एमपीएससीवर आली

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा देण्यात आलेला पर्याय (ऑप्टिंग आऊट) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पर्यायाचा गैरवापर झाल्यामुळे पर्यायच बंद करण्याची वेळ एमपीएससीवर आली असल्याचे मत स्पर्धा परीक्षार्थींनी व्यक्त केले आहे.

MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीने, पदभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) २०२२-२३च्या सुमारास लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पर्यायाद्वारे पदभरती निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याचा मूळ उद्देश होता. मात्र, या पर्यायाचा उमेदवारांकडून गैरवापर केला जात असल्याच्या, आर्थिक व्यवहार केले जात असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर, आता हा पर्यायच बंद केला जाणार आहे.

आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ऑप्टिंग आऊट ही संकल्पना लागू केली. या प्रक्रियेद्वारे तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येतो. आयोगाने बुधवारी या संदर्भात बैठक घेऊन या पर्यायासंदर्भात चर्चा केली. तसेच आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांकरीता भरती प्रकियेतून बाहेर पडणे हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी भरती प्रकियेतून बाहेर पडणे, संमती विकल्प देणे हा पर्याय रद्द करण्यात येत आहे. हा निर्णय बुधवारपासूनच लागू करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एकल संवर्गाच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतीक्षायादी कार्यान्वित राहील. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रकियेसाठी प्रतिक्षायादी राहणार नाही. बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल, अशा पदाचा अथवा निम्न पदाच्या संबंधित उमेदवाराने पसंतीक्रम दिल्यास त्याचा त्या पदासाठी किंवा निम्न पदावरील शिफारसीसाठी विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT