Shivraj More Navnath Ban  Pudhari
पुणे

MPSC Protest Pune: 'नवनाथ बन, लक्षात ठेव...', MPSC आंदोलनावरून शिवराज मोरे आक्रमक; टीका करत म्हणाले, 'मी तुला सुट्टी देणार नाही'

Shivraj More MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे.

Rahul Shelke

Shivraj More MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आंदोलनाबाबत गंभीर आरोप केल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शिवराज मोरे यांनी व्यक्त केला. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही त्यांनी केली. लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर भाजपकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी धांगडधिंगा सुरू असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. यासंदर्भातील काही व्हिडीओही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून राजकीय हेतूने सुरू असल्याचा आरोपही बन यांनी केला.

या आरोपांवर शिवराज मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. नवनाथ बन हे सातत्याने आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित व्हिडीओ उपोषण सुरू होण्यापूर्वीचा असल्याचे सांगत त्याचा आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला.

आपल्याविरोधात दाखवला जात असलेला व्हिडीओ बारमधील नसून रस्त्यावरील असल्याचे शिवराज मोरे यांनी स्पष्ट केले. त्या वेळी आपण एका मुलीला काही मुलांकडून त्रास दिला जात असल्याचे पाहून तिच्या मदतीला गेलो होतो, असा दावा त्यांनी केला. या घटनेबाबत पोलिसांकडे त्याच वेळी तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांना थेट आव्हान देत, आपली नार्को टेस्ट करण्याची तयारी असल्याचे म्हटले. तसेच आपल्याला अडकवण्यासाठी गेल्या ४८ तासांपासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनावर राजकीय आंदोलन असल्याची टीका करणाऱ्या भाजपवरही शिवराज मोरे यांनी जोरदार हल्ला चढवला. नवनाथ बन यांच्याकडून दररोज आरोप केले जात आहेत. मात्र, आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

“आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार,” अशी ठाम भूमिका शिवराज मोरे यांनी घेतली आहे. त्यामुळे MPSC आंदोलनावरून पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT