MPSC Student Protest Pudhari
पुणे

MPSC Student Protest: ‘त्यांचा पेपर होता, आमची स्वप्नं होती!’, बोचऱ्या पोस्टर्समधून सरकारवर विद्यार्थ्यांचा जोरदार प्रहार

MPSC Student Protest: पुण्यात MPSCच्या कारभाराविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, ओंकारेश्वर मंदिराजवळून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

Rahul Shelke

MPSC Student Protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात आज हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पेपरफुटी, परीक्षा आणि निकालांना होणारा विलंब, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव तसेच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात घेतलेल्या उपहासात्मक आणि बोचऱ्या पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ सुमारे पाच हजार विद्यार्थी एकत्र जमले असून, तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. MPSCच्या परीक्षा प्रक्रियेत वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे आंदोलनातून दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या पोस्टर्समधून संतापाला वाट

आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना आणि MPSCच्या कारभारावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी विविध उपहासात्मक पोस्टर्स तयार केली आहेत. या पोस्टर्समधून पेपरफुटीपासून ते प्रशासनाच्या कार्यपद्धतीपर्यंत विविध मुद्द्यांवर थेट भाष्य करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या पोस्टर्सवरील काही लक्षवेधी मजकूर असा आहे—

‘मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू?’

‘त्यांचा पेपर होता, आमची स्वप्नं होती!’

‘इतका LEAK तर माझ्या घरच्या नळातूनही पाणी होत नाही!’

‘साहेब, ती तर काही ऐकत नाही... तुम्ही तरी ऐका... #पेपरफुटी’

‘अध्यक्ष हटाओ, MPSC बचाओ!’

या घोषवाक्यांमधून विद्यार्थ्यांचा रोष आणि व्यथा स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ही अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सरकारी नोकरी मिळवण्याची संधी असते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार आणि विलंबाचा थेट परिणाम त्यांच्या भवितव्यावर होत असल्याची भावना आंदोलनात व्यक्त केली जात आहे.

पारदर्शक परीक्षा प्रक्रियेची विद्यार्थ्यांची मागणी

पेपरफुटीच्या घटनांना आळा घालावा, परीक्षा वेळेत घ्याव्यात, निकाल आणि पुढील प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी तसेच संपूर्ण परीक्षा यंत्रणेत पारदर्शकता आणावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, ‘अध्यक्ष हटाओ, MPSC बचाओ!’ या घोषणेसह विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

(वरील फोटो योगेश जगताप यांनी काढले आहेत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT