MPSC Paper Leak Pune Student Protest Pudhari
पुणे

MPSC Student Protest: MPSC पेपरफुटीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार; सरकारला घेरलं, काय आहेत प्रमुख मागण्या?

MPSC Paper Leak Pune Student Protest: पुण्यात MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढला आहे.

Rahul Shelke

MPSC Paper Leak Pune Student Protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षांबाबत उपस्थित होत असलेल्या विविध प्रश्नांच्या निषेधार्थ आज, सोमवार (७ सप्टेंबर २०२६) पुण्यात स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येत आहे. राज्यभरातील विविध भागांतून आलेले विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले असून, MPSC च्या कारभारात पारदर्शकता आणावी आणि परीक्षांशी संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

या मोर्चाला आज सकाळी १० वाजता ओंकारेश्वर मंदिर चौकातून सुरुवात झाली असून, मोर्चाचा समारोप पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. आंदोलनादरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी संविधानिक चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

विद्यार्थ्यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच गट-ब परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर आठ दिवसांच्या आत स्पष्ट भूमिका मांडावी, तसेच गैरप्रकारांची चौकशी करावी, अशीही मागणी आहे.

परीक्षांच्या पेपर तपासणीवरही प्रश्नचिन्ह

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेतील वर्णनात्मक पेपरच्या तपासणीदरम्यान झालेल्या चुकांची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय मुंबई क्राईम ब्रँचकडून MPSC ला देण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

आरोपी अधिकाऱ्याच्या कार्यकाळातील परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट

पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच लेंडवे यांच्यासह मराठे आणि नखाते या आरोपींच्या सेवाकाळाची, पदोन्नतीची प्रक्रिया आणि त्यासाठी लागू असलेल्या निकषांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या तिन्ही आरोपींच्या संपर्कातून निवड झालेल्या उमेदवारांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात यावेत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रविण पाटील आणि मयुर ठाकरे यांच्याव्यतिरिक्त अन्य एजंट्सचा या प्रकरणात सहभाग आहे का, याचाही तपास करावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

इतर परीक्षांच्या निकालांचीही चौकशी करण्याची मागणी

केवळ एका परीक्षेपुरती चौकशी मर्यादित न ठेवता, इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचीही दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः ‘DI’ मधील संशयास्पद निकाल आणि उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

याशिवाय २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच लघुलेखक अर्थात Stenographer पद निर्माण करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

‘आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही’

परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा दावा करत, आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. “आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!” असा निर्धार व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पुण्यात या मोर्चाच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे.

आता विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर MPSC आणि राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, तसेच परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT