पुणे: पुण्यातील विद्यार्थ्याला ‘चाळीस लाख रुपये द्या अन् एमपीएससीचा पेपर घ्या,’ असा फोन आला. त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘तुम्हाला एमपीएससी पूर्वपरीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो. मात्र, 40 लाख रुपये द्यावे लागतील,’ असे म्हणत विद्यार्थ्यांना आमिष दाखविणारे फोन कॉल आल्याने विद्यार्थी अन् पालक चक्रावून गेले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत हे फोन कॉल काही विद्यार्थ्यांना आले. नागपूर येथील रोहन कल्सल्टन्सीचे नाव घेऊन हे कॉल पुणे शहरातील एका विद्यार्थ्याला आले. तसाच कॉल आणखी दोन विद्यार्थ्यांना आला.
कागदपत्रांची केली मागणी
‘तुमची या परीक्षेबाबतची खरी कागदपत्रे द्या, मुख्य परीक्षेलाही अशी प्रश्नपत्रिका देऊ,’ असे आश्वासन देणारे हे फोन कॉल पुरुषाच्या आवाजात आहेत. मात्र, हे कॉल खरे आहेत की खोटे, याबाबत अजून स्पष्टता नाही तसेच विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केलेली नाही.