MPSC Pudhari Photo
पुणे

MPSC Result announce : एमपीएससीच्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, ९ हजार २५३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून ९ हजार २५३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, परीक्षेनंतर हा निकाल १७ दिवसांत जाहीर करण्यात आला आहे. नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकालही केवळ २१ दिवसांत जाहीर करण्यात आला होता.

एमपीएससीने या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. एमपीएससीद्वारे १४ जून रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी दिलेल्या कालावधीत अर्ज करणाऱ्या, तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल.

आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पूर्व परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या, समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात,न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने आवश्यक माहिती, तसेच परीक्षा शुल्क दिलेल्या मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता ग्राह्य ठरतील. पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार पूर्व परीक्षेतून ९ हजार २५३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यात अहिल्यानगरचे ४५९, अकोला येथील ९१, अलिबाग येथील ३१, अमरावती येथील २१०, बीड येथील ११२, भंडारा येथील ५६, बुलढाणा येथील ८०, चंद्रपूर येथील ९०, छत्रपती संभाजीनगर येथील ४७९, धाराशिव येथील १४३, धुळे येथील ११७, गडचिरोली येथील ४२, गोंदिया येथील २५, हिंगोली येथील २३, जळगाव येथील १५१, जालना येथील ५०, कोल्हापूर येथील ६७१, कुडाळ येथील ३१, लातूर येथील २३८, मुंबई मध्य येथील २०४, मुंबई पश्चिम येथील १४७, नागपूर येथील १७७, नांदेड येथील २१३, नंदूरबार येथील ३९, नाशिक येथील ४९७, नवी मुंबई येथील २३९, पालघर येथील ३०, परभणी येथील ६२, पुणे येथील २ हजार ८५७, रत्नागिरी येथील ४०, सांगली येथील ४३३, सातारा येथील ५१८, सोलापूर येथील ३२०, ठाणे येथील २०७, वर्धा येथील २८, वाशिम येथील ७६, यवतमाळ येथील ५७ उमेदवारांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT