पुणे : पुढारी वृत्तसेवा : मला भविष्य वर्तविता येत नसून, मी वर्तमानात राहतो. अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाली असेल, तर मला त्यावर काही बोलायचे नाही,' अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ खासदार उदयनराजे भोसले व भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कसबा मतदारसंघात भाजपकडून कोणताही नेता आला तरी धंगेकर यांचा विजय निश्चित असल्याचा अजित पवार यांच्या वक्तव्याचा खासदार उदयनराजे यांनी खरपूस समाचार घेतला. निवडणुकांमध्ये प्रत्येक जण आपापली बाजू मांडत असतो. विरोधकांना जे बोलायचंय ते त्यांना बोलू द्या. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून, त्यांचे राहिलेले काम हेमंत रासने करणार आहेत. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून, त्याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्याच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी मग चांगलं आहे, असे सांगत अधिक बोलणे टाळले. महाविकास आघाडीने सुरू केलेली लढाई आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढू, असा निर्धार महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला.