पुणे : स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. त्यांनी ही शाळा त्यांच्या स्वत:च्या राजवाड्यात सुरू केली. याच राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचे संविधान लिहिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. महात्मा जोतिबा फुले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण करत शाळा सुरू केली, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त पुण्यात फुलेवाडा येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद पेटला आहे.
खा. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे समतेचे, सर्वधर्मसमभावाचे विचार होते, ते विचार त्यांच्या पश्चात समाजात रुजविण्याचे काम ज्या समाजसुधारकांनी केले, त्यापैकी महात्मा जोतिबा फुले हे एक होते. फुले हे दूरदृष्टी असलेले समाजसुधारक होते. ते एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञही होते. त्यांनी आयुष्यभर जे कमावले त्यांनी ते सर्व समाजाच्या सुधारणेच्या कामासाठी वापरले. एका दृष्टिकोनातून पाहिले तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले.