वडगाव शेरीत पाणीटंचाईविरोधात आंदोलन Pudhari
पुणे

वडगाव शेरीत पाणीटंचाईविरोधात आंदोलन

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी; सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वडगाव शेरी आणि खराडी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करा, पंपिंग स्टेशनवरील पाण्याची चोरी थांबवा, या मागण्यांसाठी आणि टँकरमालकांच्या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवारी वडगाव शेरी पंपिंग स्टेशनवर सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलन केले. येत्या सोमवारपर्यंत (दि. 10) परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एकनाथ गाडेकर यांनी दिले.

वडगाव शेरी आणि खराडीतील काही भागांना पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या पूर्णक्षमतेने भरत नसल्याने गेल्या सहा दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी वडगाव शेरी पंपिंग स्टेशनवर आंदोलन केले.

माजी नगरसेविका सुनीता गलांडे, माजी नगरसेवक संदीप जर्‍हाड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नारायण गलांडे, महेश गलांडे, माऊली कळमकर, प्रमोद देवकर, श्रीधर गलांडे, उद्धव गलांडे, शंकर संगम, अनिल गलांडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

आंदोलकांनी पंपिग स्टेशनवरून नागरिकांना टँकर मिळत नाही आणि टँकरमालक पाण्याचा काळाबाजार करत असल्याचा आरोप या वेळी केला. वडगाव शेरी पंपिग केंद्रावरून टँकर भरणे बंद करावे तसेच वडगाव शेरी, खराडी, विमाननगरमधील पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेकडून राबविलेल्या खराडीतील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात एकूण 786 सदनिका आहेत. शिवनेरी पीएमवाय गृहसंस्था मर्यादित ‘ए’ आणि ‘बी’ विंगमध्ये हजारो नागरिक राहण्यास आले आहेत. सदनिकांचा ताबा मिळाल्यापासून नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या सोसायट्यांना जलवाहिनी जोडली नव्हती. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर जलवाहिनी जोडण्यात आली. परंतु, दोन सोसायट्यांना पाणी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे दुसरीकडे राहण्यासाठी जाण्याचा विचार करत असल्याचे प्रकल्पातील नागरिकांनी सांगितले.

प्रशासन टँकरमालकांना नोटीस पाठविणार

पाणीटंचाई असलेल्या भागात पाणीपुरवठा करावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी टँकरमालकांना दिल्या होत्या. परंतु, टँकरमालकांनी त्यांना हवे तिथे पाणीपुरवठा करण्याचा हट्ट केला. टँकरवरील सर्व चालकांना घरी पाठवून दिले.

यामुळे नागरिकांना पाणी मिळाले नाही. यामुळे टँकरमालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन प्रसंगी केली. त्यानंतर अधिकार्‍यांनी संबधित टँकरमालकांना कारणे दाखवे नोटीस पाठविणार असल्याचे सांगितले.

लष्कर जलकेंद्र आणि भामा आसखेड प्रकल्पातून आता सुरळीत पाणीपुरवठा होत असून, टाक्याही भरत आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत (दि. 10) वडगाव शेरी आणि खराडी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच, तांत्रिक समस्या तत्काळ सोडविल्या जातील. टँकरबाबत लवकर निर्णय घेतला जाईल.
- एकनाथ गाडेकर, अधिकारी, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT