पुणे

जुन्नर : स्वत:शी स्पर्धा असणारा खेळ म्हणजेच पर्वतारोहण : उमेश झिरपे

अमृता चौगुले

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : स्वत:शी स्पर्धा असणारा खेळ म्हणजेच पर्वतारोहण असून, पर्वतारोहण, गिर्यारोहण ही केवळ भटकंती नाही तर त्यात साहस आहे, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर, गिरीप्रेमी आणि गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी जुन्नर येथे केले. श्री शिवछत्रपती महाविद्यालय आणि सह्याद्री गिरीभ्रमण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्वतारोहण दिनानिमित्त "गिर्यारोहण आणि व्यक्तिमत्व विकास' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

21 व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारे एव्हरेस्टवीर आशिष माने, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, पर्यवेक्षक एस. ए. श्रीमंते या वेळी उपस्थित होते. या वेळी झिरपे म्हणाले, गिर्यारोहणाच्या माध्यमातून निसर्गात गेल्याने आपल्यात सकारात्मक बदल होतात.

युरोपीय देशात गिर्यारोहण हा जीवनशैलीचा भाग म्हणून अंगिकारण्यात आला आहे. सुदैवाने शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी श्री शिवछत्रपती महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात साहसी खेळांचे प्रशिक्षण सुरू होणे काळाची गरज आहे. कृत्रिम प्रस्तरारोहणासारखी कौशल्ये देणारे शिक्षण महाविद्यालयाने सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान गिरीप्रेमीच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांमध्ये करण्यात आलेल्या एव्हरेस्ट मोहिमा, अष्टहजारी मोहिमा यांची दृकश्राव्य माध्यमातून माहिती विद्यार्थ्यांना या वेळी देण्यात आली. या वेळी डॉ. उजागरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आभासी जगातून बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी पर्वतारोहणासारख्या साहसी क्रीडा प्रकारातून व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे गरजेचे आहे. गिरीप्रेमी संस्था, सह्याद्री गिरीभ्रमण संस्था यांच्या संयुक्त सहकार्य करारातून महाविद्यालयात अ‍ॅडव्हेंचर क्लब सुरू करण्याचे सूतोवाच करून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य गिरीप्रेमी सारख्या संस्थांना केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT