सुवर्णा चव्हाण
पुणे: हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षणाचे स्वप्न अपुरे राहिले... मात्र, खूप कष्ट करून त्यांनी आपल्या मुलीला खूप शिकवले... त्यांच्या मुलीचेही स्वप्न होते की, आपल्या आईने तिचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करावे.
परंतु, चार वर्षांपूर्वी मुलीचे निधन झाले... आईवर दुःखाचा डोंगर कोसळला... पण, आई तू शिक, स्वप्न पूर्ण कर, हे मुलीचे शब्द आई विसरली नाही... मुलीच्या इच्छेपोटी आणि स्वत:च्या स्वप्नासाठी आईने सेवासदन संस्थेच्या श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आणि ही आई आता इयत्ता तिसरीत शिकत आहे... ही कहाणी आहे सावित्री साळुंके यांची... सावित्री यांची मुलगी जान्हवी आज या जगात नाही. पण, तिने पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी तिची आई आज शिक्षण घेत आहे. (latest pune news)
शिक्षणासाठी कोणतेही वय नसते हा विचार सावित्री यांच्यासारख्या कित्येक महिलांनी मागे टाकला असून, मुलांच्या पाठिंब्यामुळे सावित्री यांच्याप्रमाणे कित्येक आईंना शिक्षणाची वाट सापडली आहे.
श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळेने त्यांना शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी वाट दिली आहे. आपण नेहमी म्हणतो, आई ही मुलांच्या पाठीशी उभी राहते. पण, आईच्या स्वप्नांसाठी मुलेही उभी राहतात, ही त्यातीलच काही उदाहरणे. आज रविवारी (दि.11) साजर्या होणार्या जागतिक मातृ दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने काही आईंशी संवाद साधला.
आपल्या प्रवासाबद्दल सावित्री साळुंके म्हणाल्या, माझ्या मुलीला शिकवण्यासाठी खूप कष्ट केले. तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. ती नोकरी करत होती. मात्र, आज ती या जगात नाही. स्वप्न साकार करण्यासाठी दहावीपर्यंत शिक्षण घेणार आहे. आज मी नोकरी सांभाळून शिक्षण घेत आहे.
ज्योती सपकाळ यांची कहाणीही प्रेरणादायी आहे. त्यांची मुलगी तेजल आणि मुलगा विनायक यांनी आईला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांची आई इयत्ता चौथीत शिकत आहे. शिक्षणामुळे ज्योती यांना बँकेतले अर्ज भरण्यापासून ते पुस्तकवाचनापर्यंतच्या गोष्टी जमू लागल्या आहेत. आई शिकत असल्याचा अभिमान तेजल आणि विनायक यांना आहे.
आपल्या प्रवासाबद्दल ज्योती म्हणाल्या, मुले लहान होती, कुटुंबीयांची जबाबदारी पेलण्यासाठी मी विविध ठिकाणी धुणीभांडी आणि स्वयंपाकाची कामे करायला लागले. मुलांनी मला शिकण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मी शाळेत प्रवेश घेतला. शाळेतील शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात. शाळेमुळे माझ्यासारख्या कित्येक जणींना शिक्षणाची वाट मिळाली आहे. आता इयत्ता पाचवीत प्रवेश घेणार आहे. माझ्या शिक्षणाचे श्रेय माझ्या मुलांना जाते.