राजगड (वेल्हे) तालुक्यातील कानंद येथे मुलीच्या घरी दसरा सण साजरा करून दौंड येथे रिक्षातून जात असताना दुर्गम रांजणे घाट रस्त्यावर (ता. राजगड) जोरदार वादळी पावसात पुलाला रिक्षा धडकून झालेल्या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रिक्षाचालकासह मयत महिलेच्या विवाहित मुलीचे प्राण वाचले. हा अपघात रविवारी (दि. 13) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडला.
शालन जगन्नाथ पासलकर (वय 65) व दीपक जगन्नाथ पासलकर (वय 45) असे मृत आई व मुलाचे नाव आहे. त्यांचे मूळगाव पानशेत धरण खोर्यातील गिवशी (ता. राजगड) असून सध्या ते पुनर्वसन वसाहत दौंड येथे राहात होते. जखमी महिलेचे नाव कविता अंकुश मरळ (वय 40, रा. कानंद, ता. राजगड) असे असून त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे खानापूर (ता. हवेली) जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे यांनी सांगितले. या दुर्घटनेतील रिक्षाचालकाचे नाव निवंगुणे असून त्याचे पूर्ण नाव समजू शकले नाही.
या दुर्घटनेतबाबत कानंद (ता. राजगड) चे पोलिस पाटील संजय कडू यांनी सांगितले की, दसरा सणासाठी आई शालन व मुलगा दीपक हे कानंद येथे मुलगी कविता मरळ यांच्याकडे आले होते. शनिवारी (दि. 12) सण साजरा करून रविवारी तेथून एका रिक्षाने तिघे माय-लेक रांजणे-पाबे घाटमार्गे पुण्याकडे जात होते. त्या वेळी जोरदार वादळी पाऊस पडत होता. घाट रस्त्यावर अचानक मोठे झाड कोसळले. त्यामुळे तीव— उतारावरून खाली येताना रांजणे गावच्या हद्दीत एका पुलाच्या कठड्याला रिक्षा धडकून अपघात झाला. यामध्ये शालन, दीपक व कविता हे तिघे जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर बराच वेळ पडून होते. रात्रीच्या सुमारास दुर्गम घाट रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने जखमींच्या मदतीसाठी कोणी आले नाही. रात्री पुण्याकडे जाणार्या एका टेम्पोचालकाला रस्त्यावर निपचित पडलेले तिघे जण दिसले. त्यानंतर त्याने सोबतच्या सहकार्यांच्या मदतीने तिघांना टेम्पोत घालून खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दीपक व शालन यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मावळा जवान संघटनेचे तानाजी भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरघे, नीलकंठ लोहकरे, कैलास दारवटकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्यासह रात्री उशिरा पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात रिक्षाचालक सुदैवाने वाचला. अपघातानंतर रिक्षाचालकाचा शोध पोलिसांना लागला नाही. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार ज्ञानदीप धिवार म्हणाले, प्राथमिक तपासात पुलाच्या कठड्याला रिक्षा धडकून अपघात झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुसर्या वाहनाने रिक्षाला धडक दिली नाही. रिक्षाचालकाकडे याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.