पुणे: विद्यार्थ्यांसोबत घडणार्या संवेदनशील घटनांना रोखण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी आरटीओची बैठक घेत शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला शालेय वाहतूक करणार्या वाहनचालकांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (दि. 31) दै. ’पुढारी’ने केलेल्या पाहणीदरम्यान बहुतांश स्कूल बस, स्कूल व्हॅन, शालेय रिक्षांमध्ये सीसीटीव्हीच नसल्याचे पाहायला मिळाले.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीदरम्यान घडणार्या संवेदनशील घटना रोखण्यासाठी आणि सुरक्षित शालेय वाहतुकीसाठी मागील महिन्यात झालेल्या बैठकीत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शालेय वाहनांमध्ये 31 जुलैच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते. दै.‘पुढारी’कडून त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरात पाहणी करण्यात आली. त्या वेळी बहुतांश शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्हीच बसविले नसल्याचे समोर आले आहे. (Latest Pune News)
आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत विशेष मोहीम हाती
शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातील अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार 31 जुलै 2025 च्या अगोदरच शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीसाठी आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ज्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही नसतील, अशा शालेय वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
शालेय वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या प्रत्येक वाहनाची नोंद शाळेकडे असणे आवश्यक असणार आहे. या शालेय वाहनांमध्ये 6 वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचारी असणे बंधनकारक असणार आहे.
असे नसल्यास वाहनमालक-चालकावर कडक कारवाई होणार आहे. याशिवाय शालेय वाहनाचा चालक-कंडक्टर आणि क्लीनर यांची पोलिस पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे, असे आदेशही बैठकीत देण्यात आले होते. याची अंमलबजावणी झाली की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
पोलिस आयुक्तांनी मागे झालेल्या बैठकीत शालेय वाहनांना सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक असल्याचे सांगत ते तातडीने बसविण्याचे आदेश दिले होते. हे सीसीटीव्ही बसविण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत शालेय वाहनांना सीसीटीव्ही बसवून घ्यावेत, असे आवाहन आम्ही शालेय वाहतूकदारांना केले होते. त्याची मुदत आता संपली आहे, त्यामुळे आम्ही1 ऑगस्टपासून शालेय वाहनांची कडक तपासणी करून ज्या शालेय वाहनांना सीसीटीव्ही नसतील अशा वाहनांवर कारवाई करणार आहे. यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश वायुवेग पथकाला देण्यात आले आहेत.- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गाडीत एखादा गुन्हा घडल्यावर पोलिस आयुक्तांनाच याचे उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तांनीच या विषयाकडे गांभीर्याने पाहत सीसीटीव्ही बसविण्याबाबत अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा वेळोवेळी पाठपुरावा करायला हवा.- एकनाथ ढोले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघटना, पश्चिम महाराष्ट्र