File photo  
पुणे

मोशी पथकर वसुली टोलनाका : स्थानिकांना मोजावे लागणार 315 रुपये

अमृता चौगुले

मोशी : नाशिक महामार्गावरील टोलनाका गुरुवारपासून (दि.5) सुरू होत असून 315 रुपये देऊन स्थानिकांना मासिक पास काढावा लागणार आहे. टोलनाका पुन्हा सुरू होणार असल्याने स्थानिक नागरिकांंसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी होणार आहे.
मोशीतील इंद्रायणीनदी पुलानजीक असलेला मोशी पथकर वसुली टोलनाका काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्याने बंद करण्यात आला होता. तो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा सुरू केला असून, या ठिकाणी गुरुवार (दि.5) पासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे.  विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांनादेखील आपल्या वाहनांसाठी वीस किलोमीटर प्रवासाचा सवलतीचा 315 रुपये किंमतीचा मासिक पास घ्यावा लागणार आहे.

याबाबत जाहीर प्रकटनच प्राधिकरणाने प्रसिद्ध केले आहे. पुढील एक वर्षासाठी हे दर असणार आहेत. अगोदरच वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीबरोबर आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागणार असल्याने नागरिकांनी मधून संतप्त भावना उमटत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते फोडलेले आहे. रिफ्लेकटरदेखील तुटलेले असल्याने मुळात महामार्ग हा महामार्ग राहिलेला नसल्याचे चित्र आहे.  मोशीतून अवघ्या सहा – सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लागत असून त्यात टोलवसुलीच्या रांगा त्यांच्या माथ्यावर पडणार आहेत. सर्वच प्रकार संताप जनक असून टोलवसुली सुरू करण्यापूर्वी राजमार्ग प्राधिकरणाने स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे होते, असे मत सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. स्थानिकांना टोलवसुली झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील अशी स्थिती आहे. गेले अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे स्थानिक प्रचंड संतापात आहेत. त्यात पुन्हा टोलवसुली होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे स्थानिकांना सरसकट टोलमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे.

टोलनाका सुरू होत आहे याची खबर असतानादेखील एकही लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांसाठी रस्त्यावर उतरला नाही. किंवा स्थानिकांना सवलत द्या, म्हणून पुढे आला नसल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक नागरिक नाराज झाले असून शेवटी आपली लढाई आपणच लढायची, अशी खूणगाठ बांधत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT