पुणे

मोरोशी-धामणगाव रस्ता झाला उंच; वाहनचालकांना अडचणी

अमृता चौगुले

वाडा; पुढारी वृत्तसेवा : मोरोशी धामणगाव रस्त्यावर धामणगावच्या बांबळे वस्तीजवळ भूगर्भीय हालचाली वा अन्य कारणाने सुमारे पन्नास मीटरचा रस्ता दीड ते दोन फुटांनी फुगला आहे. परिणामी, वाहन चालवताना अडचणी येत आहेत. मात्र, हा रस्ता अचानक का फुगला ? याबाबत गूढ कायम निर्माण झाले आहे.  शिरूर-भीमाशंकर मार्गाला जोडणारा मोरोशी- धामणगाव हा वर्दळीचा मार्ग आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले.

मात्र, मोरोशी ते धामणगाव मार्गावरील डोंगरातून जाणा-या रस्त्याखालील बांबळे वस्तीजवळ सुमारे पन्नास मीटर रस्ता काही दिवसांपूर्वी अचानक फुगला आहे. भूगर्भीय हालचाली किंवा डोंगराच्या खचण्यामुळे हा प्रकार झाल्याची शक्यता असून, त्याबाबत भूगर्भीय विभागाकडून कोणतीही चौकशी झाली नाही. जर भूगर्भीय हालचाल असेल, तर भविष्यात दुर्घटना होऊ शकते. सद्यस्थितीत रस्ता दीड ते दोन फुटांनी उचलला गेला आहे. रस्ता उतारावर असल्याने वरून येणारे वाहन येथे जोरात आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

आम्ही त्या भागाची पाहणी केली असून, जमिनीखालील हालचालींमुळे किंवा डोंगराचा काही भाग खचण्यामुळे हे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल.

           राम जाधव, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

SCROLL FOR NEXT