मोरगाव: बारामती तालुक्यातील पश्चिम जिरायत भागातील पुरंदर व बारामती तालुक्यातून वाहणारी कर्हा नदी सध्या कोरडी ठणठणीत आहे. त्यामुळे या नदीकाठावरील शेतीपिके धोक्यात आली आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनाही अडचणीत आल्या आहेत.
पावसाळ्यात या नदीला थोडेफार पाणी आले होते. त्यानंतर या नदीचे पाणी प्रवाहित झाले नाही. या नदीकाठी मयूरेश्वर पाझर तलावात शेतकरी विकत घेऊन पुरंदर उपसा सिंचनचे पाणी साठवले जाते. ते बंधार्याच्या खाली जात नसल्याने त्या काठावरील शेतीला या योजनेचा उपयोग होत नाही. या नदीच्या काठावरील शेतीपिके धोक्यात आली आहेत.
या भागातील शेतीत सध्या ऊस पीक आहे. हे पीक विहिरीच्या पाण्यावर घेतले जाते. परंतु, विहिरीच्या पाण्याने तळ गाठल्याने सध्या ऊस पीक जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकरी चंद्रकांत टेकवडे, महेश टेकवडे, मिथुन टेकवडे यांनी सांगितले. ऊस पीक वाळून गेल्यास उत्पादन खर्च वाया जाण्यासह आर्थिक अंदाजपत्रक कोलमडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तापमान वाढीमुळे पाण्याचे स्रोत आटले
मोरगाव परिसरात सध्या 39 ते 41 अंशांवर तापमान आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. पाण्याअभावी चारा पिकांसह भाजीपाला लागवडी संकटात आहेत, असे मत अनेक शेतकर्यांनी व्यक्त केले. या नदीकाठावर असणार्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनाही अडचणीत आल्या आहेत. बारामती तालुक्याच्या पश्चिम जिराईत भागातील कर्हा नदीकाठावरील शेतकर्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले.