पुणे: जिल्ह्यात चालूवर्ष 2024-25 मध्ये एकूण एक कोटी 49 लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचा अंदाज आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी सुमारे एक कोटी तीन लाख 25 हजार 493 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर 9.35 टक्के सरासरी उतार्यानुसार 96 लाख 52 हजार 644 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. याचा विचार करता अद्यापही सुमारे 46 लाख टन उसाचे गाळप होणे बाकी असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.
सद्य:स्थितीत ऊस संपल्याने इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी व निरा- भीमा सहकारी साखर कारखाने बंद झाल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले. सर्वाधिक ऊसगाळप आणि साखर उत्पादनात इंदापूरमधील बारामती अॅग्रो या खासगी साखर कारखान्याची आघाडी कायम आहे. या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे 16 लाख 90 हजार 86 मे. टन ऊसगाळप पूर्ण केले आहे, तर 8.25 टक्के उतार्यानुसार 13 लाख 61 हजार 589 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
त्या खालोखाल ऊसगाळपात दौंडमधील दौंड शुगर या कारखान्याचा दुसरा क्रमांक लागतो. या कारखान्याने 14 लाख 91 हजार 642 मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर 8.22 टक्के उतार्यानुसार 11 लाख 79 हजार 700 क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे.
बारामती तालुक्यातील श्रीसोमेश्वर सहकारीने 10 लाख 34 हजार 370 मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर 11.6 टक्के उतार्यानुसार 12 लाख 06 हजार 900 क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. मुळशी तालुक्यातील श्रीसंत तुकाराम सहकारीने तीन लाख 72 हजार 835 मे. टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याचा उतारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 11.47 टक्के आहे, तर चार लाख 26 हजार 525 क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे.