बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती-निरा या राज्य मार्गावर धावणार्या एसटी बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून, सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी त्रेधातिरपीट उडत आहे. बारामती बसस्थानक, कसबा, शारदानगर, माळेगाव, पणदरे या ठिकाणी एसटी पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची परवड होत आहे. अक्षरशः लोंबकळून विद्यार्थी बसमध्ये चढत आहेत. या मार्गावर प्रवशांची सर्वाधिक संख्या लक्षात घेता एसटीच्या फेर्या वाढवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मंगळवारी (दि. 9) माळेगाव येथील विद्यार्थी एसटीत अक्षरशः लोंबकळूनच प्रवास करताना दिसून आले.
बारामती बसस्थानकावर दररोज सायंकाळी सुमारे 500हून अधिक शालेय विद्यार्थी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करून उभे असतात. एसटी येताच विद्यार्थी जिवाच्या आकांताने एसटीमागे धावतात. शेकडोंपैकी पाच-पंचवीसच एसटीत बसू शकतात. पुन्हा गर्दी दुसर्या एसटीची वाट पाहते. अर्ध्या-पाऊण तासाने पुन्हा हाच खेळ सुरु असतो तो रात्री उशिरापर्यंत. नीरा-बारामती मार्गावरील करंजेपूल ते बारामती या दरम्यान गेली अनेक वर्ष विद्यार्थी दररोज ही त्रेधातिरपीट अनुभवत आहेत. मात्र, यावर ना बारामती आगार काहीच उपाययोजना करत आहे ना शाळा-महाविद्यालये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे कोणीही पाहत नाही.
बारामती ते निरा मार्गावर शारदानगर शैक्षणिक संकुल,व शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संकुल, नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिद्धेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मु. सा. काकडे, शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डिप्लोमा अशी महाविद्यालये तसेच उत्कर्ष, वाणेवाडी, सोरटेवाडी, सोमेश्वर अशी विद्यालये आहेत. सह्याद्री, विद्या प्रतिष्ठान व पब्लिक स्कूल अशा इंग्रजी शाळा आहेत.
बसस्थानक नावालाच
बारामती ते उच्च शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सोमेश्वर ते निरा व सोमेश्वर ते बारामती अशी स्वतंत्र बसचे नियोजन करावे लागणार आहे. शिवाय अर्ध्या तासाने बस सोडणे गरजेचे आहे. शाळा सुटताच मुले एसटीसाठी अक्षरशः धावत-पळत बसस्थानक गाठतात. बसस्थानक नावाला असून बसायलाच काय उभे राहायलाही जागा नाही. येताना एसटी भरूनच येते.
सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
एसटी गच्च भरल्याने चालकही मधल्या प्रवाशांसाठी एसटी थांबवत नाहीत. नाईलाजाने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एकीकडे राज्यातील सर्वाधिक सुंदर बसस्थानक बारामतीत तयार होत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकडे व त्यांना वेळेत शाळेत ने-आण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.