पुणे : मान्सूनने सोमवारी (दि.१५) आंध्र प्रदेश व्यापला. त्या भागातून महाराष्ट्राला ताकद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून, अरबी समुद्र अन् बंगालचा उपसागर अशा दोन्ही मान्सून शाखा आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे १८ ते २० जूनदरम्यान राज्यासह संपूर्ण देशात चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते.
अरबी समुद्रातील मान्सूनचा वेग फक्त महाराष्ट्रात मंदावला आहे. त्याखाली दक्षिण भारतात मुसळधार पाऊस आहे. याच शाखेतून मान्सूनने सोमवारी (दि.१५ जून) अवघा आंध्र प्रदेश आणि आजूबाजूची राज्ये व्यापली. त्यामुळे तेथून महाराष्ट्रातील थांबलेल्या मान्सून वाऱ्यांना बळकटी मिळू शकते. तसेच, बंगालच्या उपसागरातून वर गेलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने ईशान्य भारतासह प. बंगाल आणि बिहार व्यापले. अशा दोन्ही शाखा लवकरच एकत्र होऊन चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडमध्ये पुढील ४ ते ५ दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होईल.
उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचलमध्ये वेगळ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
पूर्व राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची प्रक्रिया सुरू
१८ जूनपासून वायव्य भारतावर ताज्या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम होण्याची शक्यता
पुढील दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
मान्सूनची सीमा बारामती, सोलापूर, हैदराबाद येथून जात आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील वरच्या हवेत चक्रीय स्थिती
ढगांच्या गडगडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा ४० ते ५० कि.मी. प्रतितास वेगाने येत आहे.
सोमवारी मान्सूनने देशातील ३५ टक्के भाग व्यापला. दक्षिण भारतातून तो महाराष्ट्राजवळच्या आंध्र प्रदेशसह बाजूच्या राज्यात गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील थांबलेल्या मान्सूनला गती मिळण्याचे संकेत आहेत. तर, दुसऱ्या शाखेने तो ईशान्य भारतासह प. बंगाल आणि बिहारपर्यंत पोहोचल्याचे नकाशात दिसत आहे. दोन्ही शाखा जवळ येत असून, त्या एकत्र झाल्या, तर मान्सून चांगला बरसण्याची आशा निर्माण झाली आहे.