आनंद वार्ता : मान्सून १३ मेंपर्यंत अंदमानात येणार; हवामान विभागाची घोषणा File Photo
पुणे

Monsoon Weather Update| आनंद वार्ता : मान्सून १३ में पर्यंत अंदमानात येणार; हवामान विभागाची घोषणा

Monsoon Weather Update : दरवर्षीच्या तुलनेत यंदा 8 ते 10 दिवस आधीच आगमन; निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

Monsoon Weather Update

पुणे : मान्सून यंदा आठ ते दहा दिवस आधीच निघण्याच्या तयारीला लागला असून तो 13 मे पर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल असा प्राथमिक अंदाज मंगळवारी (दि.6) भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे तो केरळात देखील वेळेआधीच दाखल होईल, अशी शक्यता आहे. मात्र, ती तारीख हवामान विभागाने घोषित केली नाही.

गत पन्नास दिवस देशभर उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मान्सून तयारीला लागला आहे. मान्सून दरवर्षी अंदामान-निकोबार बेटावर 18 ते 22 मे च्या सुमारास येतो. मात्र तो यंदा किमान आठ ते दहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटावर येण्याच्या तयारीत आहे, असे सॅटेलाईटने टिपलेल्या हालचालीतून दिसत असल्याचे अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. त्यामुळे तो केरळमध्ये सुद्धा किमान पाच ते सहा दिवस आधी दाखल होऊ शकतो, असे वरिष्ठ शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र, याबाबत हवामान विभागाने अजून स्पष्ट दुजोरा दिलेला नाही.

राज्याचे तापमान 40 अंशावर..

राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट होताना दिसत असून 44 ते 45 अंशावर गेलेले तापमान 40 अंशावर खाली आले होते. मंगळवारी अकोला येथे सर्वाधिक 40.3 अंश तापमानाची नोंद झाली.

मंगळवारचे तापमान...

अकोला 40.3, पुणे 37.2, जळगाव 37.8, कोल्हापूर 36.5, महाबळेश्वर 30.7, मालेगाव 39.2, नाशिक 35.3, सातारा 37.2, सोलापूर 40.2, मुंबई 34.1, धाराशिव 40, छ.संभाजीनगर 36.5, परभणी 38, अमरावती 38.4, बुलडाणा 37,ब्रम्हपुरी 40, चंद्रपूर 39, गोंदिया 36.6,नागपूर 39, वाशिम 39.5, वर्धा 38.5, यवतमाळ 39.4

काय आहे सध्याची स्थिती...

  • नैऋत्य मान्सूनची प्रगती: 13 मे च्या सुमारास दक्षिण अंदमानातील समुद्राच्या काही भागात तसेच आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांकडे जाण्याची शक्यता आहे.

  • कोकण आणि गोवा राज्यात 7 मे रोजी तर मराठवाड्यात 8 मे रोजी वादळाची शक्यता

  • गुजरात राज्याला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट

  • मराठवाड्यातील काही ठिकाणी ताशी 70 ते 110 किमी वेगाने वादळी वारे वाहतील.

  • समुद्रसपाटी जवळ सध्या हवेचे दाब जास्त असून ते जमिनीकडे कमी आहेत. त्यामुळे वार्याचा वेग समुद्राकडून जमिनीकडे जास्त वेगाने सुरू झाला आहे.

  • पंजाब आणि वायव्य राजस्थानला लागून असलेल्या मध्य पाकिस्तानवर चक्राकार परिभ्रमण म्हणून पश्चिमी विक्षोभ कायम आहे.

अंदामानात मान्सून दरवर्षी 18 ते 22 मे च्या दरम्यान येतो.मात्र यंदा तो 13 मे दरम्यान येईल असा अंदाज आहे,म्हणजे सुमारे 8 ते 10 दिवस आधीच तो दाखल होत आहे.केरळ मध्ये तो कधी येईल याचा अंदाज अजून आलेला नाही .
-डॉ.एस.डी.सानप,वरिष्ठ शास्त्रज्ञ,आयएडी,पुणे
नैऋृत्य मान्सून 13 मे च्या सुमारास दक्षिण अंदामान समुद्र, बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागासह निकोबार बेटांवर पुढे सरकण्याची शक्यता आहे. तो लवकर येईल का या बाबत आत्ताच अंदाज बांधणे कठीण आहे.भारतीय हवामान विभाग 15 मे च्या आसपास तो अंदाज देईलच.मात्र केरळमध्ये तो वेळेवर येईल असे दिसते.
-डॉ.कृष्णानंद होसाळीकर,निवृत अतिरिक्त महासंचालक,आयएमडी,पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT