Monsoon News Pudhari File Photo
पुणे

Monsoon Update : मान्सून १९ सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला, महाराष्ट्रातून २५ ते २८ सप्टेंबरदरम्‍यान घेणार माघार

गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरू असल्याने विदर्भात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मान्सूनने परतीच्या प्रवासाची तयारी केली असून, पश्चिम राजस्थानातून तो १९ सप्टेंबर रोजी परतीच्‍या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला २५ ते २८ सप्टेंबर उजाडेल, असा अंदाज आहे. दरम्यान गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरू असल्याने विदर्भात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.

यंदा देशात मान्सून सरासरीच्या खूप कमी म्हणजे ८४ टक्के इतका बरसला. त्यामुळे देशाच्या ३९ टक्के भू-भागावर दुष्काळसदृश स्थिती आहे. सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाकडून अपेक्षा असतानाच १९ सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून माघारी फिरणार असल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे.

गुजरातच्या अतिवृष्टीचा परिणाम विदर्भात

गुजरात राज्यात अतिवृष्टी सुरू असून मंगळवारी (दि. १५) ही तेथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस वाढणार असून तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे मान्सूनची स्थिती

- १९ सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मोसमी पावसाच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

- नैऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागांवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय राजस्थान आणि लगतच्या उत्तर गुजरातकडे गेले आहे.

- वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या उत्तर ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रिय स्थिती कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT