यंदा मान्सून राज्यातून दरवर्षीच्या तुलनेत लवकर माघारी परतणार आहे. मात्र, त्यापाठोपाठ अवकाळी पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम थेट डिसेंबरपर्यंत राहणार असून, 115 टक्के बरसण्याचा अंदाज आहे. हा अवकाळी पाऊस ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याचे कारण ला-निना तटस्थ अवस्थेतून सक्रिय अवस्थेकडे जात आहे.
दरवर्षी मान्सून राज्यातूून साधारणपणे 5 किंवा 6 ऑक्टोबरला निघतो. तो 15 ते 18 ऑक्टोबरपर्यंत बरसून मग पुढे दक्षिण भारतात जातो. त्यानंतर पावसाचा मोठा खंड असतो. नोव्हेंबरमध्ये दिवाळीत बहुतांशवेळा हलक्या सरी पडतात. मात्र, हा पाऊस साधारण 30 ते 50 मिमी इतका असतो. मात्र, यंदा मान्सून परतल्यावर लगेच अवकाळी पाऊस सुरू होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून राज्यातून दक्षिण भारतात जाण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पूर्णपणे जाईल, असा अंदाज आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तसेच, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही कमी दाबाचे पट्टे तयार होऊन अधूनमधून अवकाळी पाऊस पडेल. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या मान्सुनोत्तर (अवकाळी) पावसाचे प्रमाण 115 टक्के राहणार आहे.