पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी भागात मान्सून सक्रियतेची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती डॉ. के. ए. होसाळीकर यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात पुढील ४ ते दिवस #मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकण आणि घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आजपासून (दि.13 जुलै) ते मंगळवार 16 जुलै या कालावधीत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 जुलै आणि 15 जुलै रोजी कोस्टल कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात तर 13 जुलै ते 16 जुलैपर्यंत गुजरात आणि मंगळवार 16 आणि बुधवार 17 जुलै रोजी सौराष्ट्र आणि कच्छ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या बुलेटीनमध्ये वर्तवली आहे.
शुक्रवार 13 जुलै रोजी पूर्व उत्तर प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, 13 आणि 14 जुलै रोजी छत्तीसगड, 15 जुलै रोजी तेलंगणा, मराठवाडा आणि विदर्भ तसेच 14 आणि 15 जुलै रोजी ओडिशा या राज्यात देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नैऋत्य भारतात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.१३ जुलै) आणि रविवारी (१४ जुलै) राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेंड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टीची (204.4 पेक्षा कमी) शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवली आहे.