कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतून अपहरण करून साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.१६) उघडकीस आला. याप्रकरणात नवनाथ रिठे (वय २७) याला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत बालिकेच्या वडीलानी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ हद्दीत भागवतवस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पिडित बालिकेचे अपहरण केले. त्यानंतर बालिकेला मळद (ता. दौंड) गावच्या हद्दीत ऊसाच्या शेतात नेले. त्याठिकाणी बळजबरीने बालिकेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण करीत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.