शिरूर: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे तुळजापूरहून उदरनिर्वाहासाठी आलेल्या 40 वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर ही गोष्ट कोणाला सांगू नये, यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूरहून एक 40 वर्षीय व्यक्ती त्याची पत्नी व मुलीसह रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त आला होता. काही दिवसांपूर्वी पत्नी कामानिमित्त बाहेर गेलेली असताना त्या नराधमाने स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला. (Latest Pune News)
मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला, परंतु नराधम आरोपीने हा प्रकार जर कोणाला सांगितला तर दोघींनाही जिवे मारून टाकील, अशी धमकी दिली. परंतु आईने धाडस करून रांजणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या नराधमाला अटक केली. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.