केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ Pudhari
पुणे

पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे; अन्यथा आमच्या पद्धतीने काम करू : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

दोन दिवसांपूर्वी मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे पोलिसांनी खरे तर आता आत्मपरीक्षण केले पाहिजे. शहराची संस्कृती वेगळी आहे. माझ्या पुण्याचे नाव खराब होऊ नये, ही पोलिसांची जबाबदारी आहे. गुंडांकडून सोशल मीडियावर रिल्स टाकले जातात. आमच्या तरुण पिढीने, याचे अनुकरण करायचे. त्यामुळे पोलिस आयुक्त, सर्व अधिकार्‍यांना माझे हे सांगणे आहे, की शहरातील हे सर्व प्रकार थांबले पाहिजे अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही काम करू, असे खडे बोल सुनावत केंद्रीय नागरी वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने काम सुरू राहिले, तर पुणे पोलिसांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहरातील टोळीप्रमुख आणि सदस्यांना बोलावून त्यांची परेड घेण्यात आली. याच परेडमध्ये सहभागी असलेल्या गुंडांकडून, त्यांच्या हस्तकांकडून समाजमाध्यमावर रिल्स टाकले जात आहेत. याबाबत मोहोळ यांना पत्रकारांनी विचारले असता, ते बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. याबाबत मोहोळ यांनी स्पष्ट केले की, संबंधित व्यक्ती माझ्या कार्यालयात काम करत नसून, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पुण्यातील कोणत्याही भागातील नागरिक, तरुण असेल तरी त्याबाबत पोलिसांनी तीच कडक भूमिका घेतली पाहिजे. मारहाणीत जे कोणी सहभागी आहेत त्यांना पोलिसांनी सोडू नये. तसेच त्यांना कोणी वाचविण्यासाठी येत असेल, तर त्यांनादेखील सोडू नये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी पुण्यातील गंभीर गुन्हेगारी घटनांवर आणि टोळीप्रमुखांच्या सोशल मीडियावरील प्रभावावर नाराजी व्यक्त करत मोहोळ यांनी पुणे पोलिसांना खडसावले. आमच्या शहरात अशा प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी पोलिसांना दिला. मोहोळ म्हणाले, सोशल मीडियावर गुन्हेगारांचे वाढते प्रस्थ पोलिस का रोखू शकत नाहीत ? त्यावर कारवाई का होत नाही ? दोन दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. संबंधित व्यक्ती माझ्या कार्यालयातील कर्मचारी नसला, तरी तो भाजपचा कार्यकर्ता आहे. कोथरूडमध्ये त्याला रस्त्याने जाण्यासाठी जागा नव्हती म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. कोणत्याही नागरिकासोबत असे घडू नये. पुण्यात कोठेही असे प्रकार घडले, तर ते सहन केले जाणार नाही. या वेळी पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी एका पोलिसाला झालेल्या मारहाणीबाबत विचारले असता, मोहोळ म्हणाले, पोलिसांनी आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. आम्ही निवेदन आणि मागण्या किती वेळा करायच्या ? अशा प्रकारची गुंडगिरी माझ्या शहरात मी खपवून घेणार नाही, असे म्हणत त्यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT