पुणे: शहराची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता जलसंपदा खात्याने 21 टीएमसी इतका पाण्याचा कोटा तातडीने मंजूर करायला हवा. भाजप सरकार यात टाळाटाळ करत असून, त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.
जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला 14 टीएमसी पाणी कोटा मंजूर केला. परंतु, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा कोटा 21 टीएमसीपर्यंत वाढविण्याची गरज आहे. ही वाढीव मागणी मंजूर करण्याऐवजी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जादा पाणी वापराबद्दल महापालिकेला दंड करण्याचा इशारा दिला, हे कितपत योग्य आहे, असा सवालही जोशी यांनी केला आहे.
कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी त्यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, भाजपच्या मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याचा फटका पुणेकरांना बसत आहे. खडकवासला धरण साखळीतून पुण्याला 21 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनीही केली होती. मग आता ते गप्प का, असा प्रश्नही जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.