पुणे

पुणे : संयमी नेतृत्व म्हणजे मुक्ताताई श्रद्धांजली; सभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजपरिवर्तनासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांसारखे जीवन जगणार्‍यांची संख्या राजकीय क्षेत्रात खूप कमी असते. एकनिष्ठ, पक्षनिष्ठा, कर्तव्यपूर्ती, संयमता याही पलीकडे जाऊन राजकीय जीवन कसे जगता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक होय, अशा शब्दात सर्वपक्षीय नेत्यांनी भावना व्यक्त केल्या.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय नेत्यांनी रविवारी रमणबाग शाळेच्या क्रीडांगणावर श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सार्वत्रिक विकासाचा आधारवड गमावला असला, तरी राजकारणात नव्याने आलेल्या आणि येऊ पाहणार्‍यांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत ठरावा, म्हणून मुक्ता टिळक यांचे स्मारक उभे राहावे, असा एक सूर रविवारी सर्वपक्षीय नेत्यांमधून उमटला.

बिनविरोध निवड हीच आदरांजली
राजकारणात पक्षीय नेते-कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असताना त्याची तमा न बाळगता सर्वांना सोबत घेऊन काम करणार्‍या मुक्ताताईंच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करावी, हीच त्यांना खरी आदरांजली असेल, असे मतही सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केले.

यावेळी उच्च तंत्रशिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, आमदार संजय कुटे, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, भीमराव तापकीर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, डॉ. रोहित टिळक, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन धरपुडे, रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे शहरप्रमुख साईनाथ बाबर आणि राजेंद्र वागस्कर, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्राली टिळक, स्नुषा श्रुतिका टिळक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, मोहन जोशी, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, भाजपचे सरचिटणीस-माजी महापौर मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर, प्रमोद कोंढरे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजय मोरे, गजानन धरपुडे, माजी नगरसेवक गणेश बीडकर, गायत्री खडके, धीरज घाटे, राजेश येनपुरे, कमल व्यवहारे आदी राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर, घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट, दगडूशेठ गणपती मंदिर संस्थेचे महेश सूर्यवंशी यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मतदारसंघातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. त्यापूर्वी मुक्ता टिळक यांच्या आठवणींतील प्रसंगांबाबत लघुपट दाखविण्यात आला.

मतभेद असलेतरी मनभेद नसावेत, हे संस्कार मुक्ता टिळक यांच्या जीवनातून अधोरेखित होतात. माणूस म्हणून आपण सर्वजण एकच आहोत, असा भाव त्यांच्या कामांतून वेळोवेळी दिसून यायचा. पक्षनिष्ठेच्या जोरावर आणि संयमाच्या गुणावर त्यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले. देश किंवा राज्य पातळीवर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतील ते घेतील, पक्षीय मतभेद असले तरी मनभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे, यासाठी पुण्यातून सुरुवात करावी, यातून चांगली संस्कृती निर्माण होईल.

                                              – चंद्रकांत पाटील, उच्च तंत्रशिक्षणमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT