पुणे: आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक व वैभवशाली परंपरा आहे. देहू व आळंदीतून लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन विठूनामाचा गजर करत पंढरपूरच्या वाटेवर चालत आहेत. पायी वारीत चालून थकलेल्या, शिणलेल्या या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून, हे पुण्याचे काम आपल्या हातून होतेय, याचे समाधान आहे, असे मत केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पंढरपूर प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने 'फिरता वारकरी दवाखाना' या उपक्रमाचे उद्घाटन करताना मोहोळ बोलत होते.
या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, 'सिम्बायोसिस'चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, 'सिम्बायोसिस'चे डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टीकोन विकसित होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा वाटतो.
डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, वारी ही स्वयंनियोजित, स्वयंशिस्तीने चालणारी परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी या वारीमध्ये सहभागी व्हावेच; पण यावर संशोधनही करावे. व्यवस्थापन, नियोजन, स्वच्छता, सामाजिक समरसता या वारीमध्ये अनुभवायला मिळते. प्रास्ताविक ॲड. अविनाश साळवे यांनी केले. रेवती पाठक यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर दरोडे यांनी आभार मानले.