शिवाजी शिंदे
पुणे: राज्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 2 हजार 751 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यातही पहिल्या टप्प्यात 930 गावांमध्ये हे टॉवर उभे राहणार आहेत.
हे टॉवर उभे करण्यासाठी राज्य शासनाने 200 चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली असून, ही जागा हस्तांतरित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान या मोबाईल टॉवरमुळे बीएसएनएल सेवेच्या ‘फोर जी’ सुरुवात या भागात होणार असून, या अतिदुर्गम भागातील नागरिक जगाशी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधणार आहेत. (Latest Pune News)
राज्यातील अतिदुर्गम भागात अजूनही वीज, पाणी, एस.टी.च्या प्राथमिक सुविधा पाहिजे त्या प्रमाणात पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे मोबाईल ही त्या भागातील नागरिकांसाठी बाब म्हणजे अतिशय दुर्मीळच आहे. परिणामी या भागातील नागरिकांचा इतर भागाशी संपर्क येणे महाकठीण काम.
आता मात्र यामध्ये काळानुसार मोठ्या प्रमाणावर बदल होत चालले आहेत. त्यामुळे या अतिदुर्गम असलेल्या भागातील नागरिकांना हळूहळू का होईना सोयीसुविधा मिळू लागल्या आहेत. शिक्षणाबरोबरच दैनंदिन गरजांसाठी त्यांना कायमच दुसऱ्या भागावर अवलंबून रहावे लागत होते. त्याची अवलंबिता कमी होऊ लागली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे मोबाईल होय.
या अतिदुर्गम भागातील नागरिकांना जगाशी संपर्क साधता यावा यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या बी.एस.एन.एल. या कंपनीच्या माध्यमातून मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. या टॉवरमुळे राज्यातील् अतिदुर्गम भागात राहणाऱ्या गावांमधील नागरिकांच्या हाती आता मोबाईल दिसणार असून, त्यांना या टॉवरच्या माध्यमातून जागाशी संपर्क साधता येणार आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या ज्या भागात मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. या भागातील जिल्हाधिकाऱ्यांनी विनामोबदला 200 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ही जागा 15 दिवसांत उपलब्ध करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान या मोबाईल टॉवरसाठी आवश्यक असणारी वीज जोडणी, ओएफसी केबल टाकण्यासाठी रस्त्याचा वापर देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
काय होणार फायदा?
अतिदुर्गम भागातील नागरिकांना मोबाईल टॉवरमुळे जगाशी संपर्क साधण्यास होणार मदत.
मोबाईल टॉवर उभारण्यास विनामोबदला जागा उपलब्ध झाल्यामुळे टॉवर उभारणीचे काम होणार लवकर.
अतिदुर्गम भागात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बी.एस.एन.एल. कंपनीचा राज्य शासनाला प्रस्ताव.
राज्यातील 36 पैकी 34 जिल्ह्यांतील अतिदुर्गम भागातील गावांत मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत.