पुणे

पुणे : आजी-माजी आमदारांमध्ये उपोषणावरून जुंपली

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वडगाव शेरी मतदारसंघातील प्रश्नांसाठी आमदार सुनिल टिंगरे यांचे उपोषण म्हणजे स्टंटबाजी असून, त्यांच्या निष्क्रियेतचा भोपळा फुटल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी केला. तर मोदी लाटेतही वडगावशेरीकरांनी 2019 ला मुळीक यांना घरी पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे असे प्रत्युत्तर टिंगरे यांनी दिले आहे.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार टिंगरे यांनी गुरुवारी (दि. 6) महापालिका भवनासमोर उपोषण केले. त्यावर मुळीक यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'राज्यात तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून टिंगरे यांना वडगाव शेरीतील मोठ्या प्रकल्पांसाठी शून्य निधी मिळाला.

आपले अपयश लपविण्यासाठी टिंगरे हे सातत्याने भाजपने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किंवा सुरू करीत असलेल्या प्रकल्पांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. त्यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे.' भाजपच्या माध्यमातून मेट्रो, पाणी पुरवठा, उड्डाणपूल अशी कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार बापू पठारे, माजी नगरसेवक योगेश मुळीक उपस्थित होते.

दरम्यान मुळीकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार टिंगरे म्हणाले, 'राजकीय आरोप न करता केवळ मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, या उपोषणाला केवळ मतदारसंघातूनच नाही तर शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

खरे तर पाच वर्षे ते आमदार होते. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. असे असताना त्यांना हे प्रश्न सोडविता येऊ शकले नाहीत. मी विरोधी पक्षात असून मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. प्रमुख प्रश्न मार्गी लागत आहेत. आमदार झाल्यावर अवघ्या तीन महिन्यांत भामा आसखेडचा पाणी प्रश्न सोडविला. त्यामुळे घाबरलेल्या मुळीकांनी निरर्थक पोपटपंची केली आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT