पुणे

इंदापूर बाजार समितीवर मोहोळचे आ. यशवंत माने यांची संचालकपदी बिनविरोध निवड

अमृता चौगुले

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेळगाव (ता.इंदापूर)  येथील व सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत विठ्ठल माने हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती प्रवार्गातून बिनविरोध विजयी झाले आहेत. इंदापूर बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये छाननी नंतर १४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.

या निवडणूकीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आमदार दत्तात्रय भरणे,माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व जेष्ठ नेते अशोक घोगरे तसेच डॉ. शशिकांत तरंगे यांच्यासह अन्य गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार या निवडणुकांमध्ये उभे ठाकले असल्याने निवडणूक बिनविरोध न होता अत्यंत चुरशीची होणार आहे ही शक्यता नाकारता येणार नाही.

निवडणुकीमध्ये चार ते पाच गट तयार झालेले असताना देखील मोहोळ चे आमदार यशवंत विठ्ठल माने हे एकमेव सर्वात अगोदर ग्रामपंचायत प्रवर्गातुन संचालकपदी बिनविरोध झालेले आहेत. ग्रामपंचायत अनुसूचीत जाती जमाती प्रवर्गातुन ५ जणांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरले आणि दोघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सोमवारी( दि १७) मोहोळचे आमदार यशवंत विठ्ठल माने हे संचालक पदी बिनविरोध विजयी झाले आहेत.

यावेळी आमदार यशवंत माने यांनी सांगितले कि,इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये उपसभापती म्हणून काम करत असताना मला मोहोळची आमदारकी मिळाली आणि मार्केट कमिटीमध्ये मागील पाच वर्षात जेवढे जमेल तेवढे शेतकरी व व्यापारी वर्गासाठी संचालक मंड्ळाच्या समवेत हिताचे निर्णय घेतले. पुन्हा पाच वर्षासाठी मला काम करण्यासाठी बिनविरोध संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,आमदार दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,राष्ट्रवादी कॉग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह सर्व मतदारांचा आभारी आहे.

मोहोळ नंतर इंदापूरलाही बिनविरोध पँटर्न
महाराष्ट्रात एकमेव मोहोळ तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समितीही माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत राजन पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली असून त्या मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत विठ्ठल माने हे ही देखील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालकपदी बिनविरोध झाले आहे.

SCROLL FOR NEXT