पुणे

अ‍ॅटोरिक्षांच्या बंदला पिंपरी शहरात संमिश्र प्रतिसाद

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरात सुरू असलेल्या बेकायदा सुरू असलेल्या बाईकटॅक्सी विरोधात शहर रिक्षा संघटनांच्या वतीने सोमवार (दि. 12) रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या बंदला शहर परिसरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली. बाइकटॅक्सीविरोधात गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनानंतर सरकारने बाईकटॅक्सी बंद करण्याबाबतचे आश्वासन दिले.

मात्र तरीदेखील कारवाई होत नसल्याने शहरातील सोळा संघटनांच्या वतीने पुन्हा बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरू करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी सकाळी रिक्षाचालकांनी बंद आंदोलन सुरु केले; मात्र सायंकाळनंतर शहरातील विविध रस्त्यांवर रिक्षा धावत असल्याचे दिसून आले. पिंपरी, आकुर्डी व दापोडी या भागात रिक्षा वाहतूक बंद होती. आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून निगडी आगारामधून 151 बस पहिल्या सत्रात रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या.

पीएमपीने घेतला सावध पवित्रा
गेल्या संपादरम्यान पीएमपीने नियोजन केले नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. या आंदोलनादरम्याने पीएमपीने सावध पवित्रा घेत, सकाळच्या सत्रात तब्बल 151 गाड्या मार्गावर धावत होत्या. तर, दुपारच्या सत्रात 122 गाड्या धावल्या. निगडी आगाराला नऊ लाख 64 हजार 894 रुपये तिकीट विक्रीतून तर, एक लाख 89 हजार 912 रुपये पास विक्रीतून उत्पन्न मिळाले.

फज्जा उडाल्याचा दावा
महाराष्ट्र रिक्षापंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे रिक्षाचालकांच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचा दावा केला. आंदोलनात संलग्न संघटना सहभागी झाल्या नसल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

रिक्षा लॉक करून आंदोलन
आरटीओ कार्यालयासमोर शहरातील हजारोंच्या संख्येने रिक्षाचालकांनी रिक्षा हँडल लॉक करून आंदोलन केले. बाईकटॅक्सी बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असा पवित्रा संघटनांनी केला. रॅपिडो दुचाकीसेवा सुरूच असल्याने ही सेवा बंद केल्यानंतर आम्ही आंदोलन थांबवू, अशी ठाम भूमिका बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी घेतली.

कॅब चालकांचे फावले
रिक्षा बंद असल्याने कॅबचालकांचा चांगला व्यवसाय झाला. प्रवाशांना वेळेवर अ‍ॅटो रिक्षा उपलब्ध न झाल्याने परिणामी कॅबचा पर्याय निवडला. त्यामुळे चालकांचे चांगलेच फावले होते. मात्र बंदमुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.

SCROLL FOR NEXT