पुणे: उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि शहरांतील उष्णतेचा वाढता चटका, यांचा सामना करताना इमारती थंड ठेवण्यासाठी आता निसर्गाचीच मदत घेता येईल का, या प्रश्नाचे उत्तर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी- डब्ल्यूपीयू) विद्यार्थ्यांनी शोधले आहे. इमारतींच्या दर्शनी भागावर शैवाल आणि मॉस यांसारखे जिवंत जैविक आवरण वाढवून भिंती नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्याचा अभिनव प्रयोग या विद्यार्थ्यांनी केला आहे.
'भारतीय हवामानासाठी निष्क्रिय शीतकरणाची जैवग्राही दर्शनी भाग प्रणाली' या प्रकल्पाची मोबियस फाउंडेशन आणि द क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्ट आयोजित 'यूथ फॉर अर्थ मोहीम २०२६'चा विजेता म्हणून निवड झाली. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे नुकत्याच झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता शिक्षण परिषदेत या चमूचा गौरव करण्यात आला. बायोइंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचे चार बी.टेक. विद्यार्थी आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील दोन विद्यार्थी, अशा सहा जणांच्या चमूने प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प साकारला आहे.
पारंपरिक हरित भिंतींना माती आणि सिंचन यंत्रणा लागते. या प्रकल्पात मात्र तसे काहीही लागत नाही. भिंतींवर लावलेले खास अभियांत्रिकी आवरण मॉस, शैवाल आणि सायनोबॅक्टेरिया यांना वाढण्यासाठी पृष्ठभाग उपलब्ध करून देते. हे जैविक थर दोन प्रकारे इमारतीला गारवा देतात. पहिले म्हणजे बाष्पोत्सर्जन. पाण्याच्या बाष्पीभवनातून भिंतीतील उष्णता शोषली जाते. दुसरे म्हणजे सौर सावली. या थरामुळे भिंतीवर थेट पडणारे ऊन कमी होते. नेदरलँड्स आणि बेल्जियमसारख्या समशीतोष्ण देशांमध्ये झालेल्या संशोधनात अशा प्रणालींमुळे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत घटल्याची नोंद आहे. हेच तंत्र भारतासारख्या अधिक उष्ण आणि बदलत्या हवामानात कितपत उपयुक्त ठरू शकते, याचा अभ्यास एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या चमूने केला.
प्रकल्पाच्या दुसऱ्या मार्गदर्शक आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. शीतल कुलकर्णी म्हणाल्या, वेगवेगळ्या शाखांतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील एका आव्हानावर एकत्र काम करण्याची संधी या प्रकल्पाने दिली. बायोइंजिनिअरिंगला ॲप विकसनाची आणि प्रत्यक्ष वेळेतील माहिती दर्शवण्याची जोड देऊन तंत्रज्ञान आणि जैविक प्रणाली एकत्र येऊन कोणते व्यावहारिक उपाय देऊ शकतात, याचा हे विद्यार्थी शोध घेत आहेत.
काय म्हणतात मार्गदर्शक
प्रकल्पाच्या मार्गदर्शक आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीतील बायोइंजिनिअरिंग विभागाच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. शर्बानी कौशिक म्हणाल्या, की शैवाल आणि सायनोबॅक्टेरिया सूर्यप्रकाश व कार्बन डायऑक्साइडच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे शाश्वत इमारत आवरणासाठी ते उपयुक्त ठरू शकतात.