खेड : खेड तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातील दाजीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला तिच्या आईच्या मोबाइलवर दाजीने फोन करून, 'कांद्याची गाडी खाली करायला पुण्याला जायचं आहे, तू माझ्यासोबत चल, नाहीतर मी माझं जीवाचं काही करेन', अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने घराबाहेर येऊन गाडीत बसून पुण्याला जाण्यास सहमती दर्शवली.
पुण्याहून परतल्यानंतर आरोपी दाजीने फिर्यादीला एका भाड्याच्या खोलीत नेले. तिथे २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. फिर्यादीने आपल्या आई-वडिलांकडे परत जाण्याची विनंती केली असता, त्याने 'तू माझ्यासोबतच राहायचं, नाहीतर तुझ्या बहिणीला मारून टाकीन', अशी धमकी दिली. रविवारी (दि. ३१ ऑगस्ट) रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादीचे आई-वडील आणि चुलते शोध घेण्यासाठी संबंधित खोलीवर आले. त्यांना पाहताच आरोपी दाजी खोलीतून पळून गेला. फिर्यादीला तिच्या कुटुंबीयांनी घरी आणले असता तिने हा सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर फिर्यादी आणि तिच्या कुटुंबीयांनी खेड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.
सहायक पोलिस फौजदार साबळे यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, सहायक पोलिस निरीक्षक गुरव यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आरोपी दाजी सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी केली आहे.