पूल पाडणार असल्याची माहिती कळताच ते पाहण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी. 
पुणे

पुणे : पूल गिरा नही, पूल गिरते नही! पूल पाडण्यावरून सोशल मीडियावर ‘मिम्स’चा पाऊस

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या महिनाभरापासून चांदणी चौकातील पूल पाडला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच नोयडातील बहुमजली इमारत पाडणार्‍या कंपनीलाच काम देण्यात आले. त्यामुळे पूल त्या इमारतीप्रमाणेच काही क्षणात जमीनदोस्त होईल, अशी पुणेकरांची अपेक्षा होती. मात्र, सुरुवातीला पुलाचा सांगडा तसाच उभा दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ पाहायला मिळाला.

चांदणी चौकातील पूल पाडणार असल्याची घोषणा सुरू झाल्यापासून फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअ‍ॅपसह सगळीकडेच पूल चर्चेत होता. हा पूल पाडण्यासाठी केलेल्या नियोजनापासून ते पाडण्याची तारीख ठरेपर्यंत सर्वांचे लक्ष होते. 'मोजून 30 मीटरचा पूल पाडणार आहेत आणि आव असा आणलाय जणू काही चीनची भिंतच पाडायची आहे!' हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली. 'जर तेव्हाचं युद्ध पानिपतऐवजी बावधनला ठेवलं असतं तर अब्दाली चांदणी चौकातूनच घाबरून परत गेला असता!' असे मिम्स व्हायरल झाले.

पूल पुणे शहरातला असल्यामुळे 'पूल पाडायचा तर एवढी तयारी कशाला हवी? येता जाता पुणेकरांनी चार-दोन टोमणे मारले तरी पूल पडेल,' या टोमण्याची भर पडली. 2 ऑक्टोबरला रात्री 1 ते 2 दरम्यान पूल पाडला जाणार होता. पुणेकर हे दृश्य डोळ्यांत साठवायला गर्दी करणार, हे स्वाभाविक असल्यामुळे चांदणी चौकातील रहिवाशांकडून 'आमच्या येथे चांदणी चौक पूल पडताना लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली आहे. खिडकीतून पाहण्याचे 500 रुपये, तर गच्चीवरून पाहण्याचे 1000 रुपये. या शुल्कामध्ये चहा-कॉफी-बाकरवडी वगैरे समाविष्ट नाही,' अशी एक तिरकस पुणेरी पाटीही सोशल मीडियावर पाहायला मिळाली.

पूल पाडण्यासाठी घडवून आणलेल्या स्फोटानंतरही पूल संपूर्ण पडला नाही. त्यामुळे 'मागच्या दिवाळीतले सादळलेले फटाके वापरले होते बहुदा!' असा पुणेरी टोमणा मारला गेला नसता तरच नवल. 'पूल गिरा नहीं, पूल गिरते नहीं' या शाब्दिक कोटीवरही बरेच लाईक मिळाले आणि मोठ्या प्रमाणात ती शेअर करण्यात आल्याचे दिसले. पुणे शहर आणि पुणेकरांचा लाडका 'पुलोत्सव' आठवून पूल पाडण्याच्या उत्सवाचं 'पूलोत्सव' असं नामकरणही सोशल मीडियावर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT