महाळुंगे पडवळ : दूध पावडर आणि बटरचे दर कमी झाल्याने दूध प्रकल्पांनी 25 मेपासून टप्प्याटप्प्याने दूध खरेदी दर दोन रुपयांनी कमी केले आहेत. अजूनही एक रुपया दर कमी होण्याची शक्यता दूध प्रकल्पांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या दूध उत्पादक शेतकर्यांना 3.5 फॅट्स आणि 8.5 एसएनएफला 32 रुपये दर मिळत आहे. पूर्वी हा दर 34 रुपये होता. दूध दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.
आंबेगाव तालुका दूध उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यात सुमारे 15 संकलन केंद्रांमार्फत दररोज सरासरी सुमारे 6 लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. तालुक्यात जवळपास 72 हजार 300 भाकड आणि दूध देणार्या गायी आहेत. सरासरी 40 हजार पोती पशुखाद्याची तालुक्यात विक्री होत असून त्यातून 6 कोटी 40 लाख रुपयांचा महसूल पशुखाद्यातून तयार होत आहे. दूध व्यवसाय हा शेतकर्यांसाठी एक प्रमुख जोडधंडा असून हा व्यवसाय अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकरी उपलब्ध होत नसल्याने बँकांकडून कर्ज घेऊन हवेशीर मुक्त गोठ्यांची निर्मिती करून दुग्धव्यवसाय सुरू केले आहेत. या व्यवसायाने ग्रामीण भागात समृद्धीचे नवीन वारे वाहत असताना महिलाही आत्मनिर्भर झाल्याचे दिसत आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुधाचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात 3.5 फॅट्स आणि 8.5 एसएनएफला 32 रुपये दर मिळत आहे. पर्यायाने 2 रुपये दर कमी करण्यात आले आहेत. पशुखाद्याच्या 50 किलो पोत्याची शेंगदाणा पेंड 2500 ते 3000 रुपये, कांडी 1500 ते 1800, भुस्सा 1350 ते 1550, सरकी पेंड 1900 ते 2100 रुपये बाजारभाव आहे. दुधाचे भाव वाढल्यास लगेच पोत्याचे बाजारभाव वाढतात, परंतु दुधाचे दर कमी झाल्यास पशुखाद्याचे दर कमी होत नाहीत. सध्या उत्पादन खर्च वाढल्याने दूध व्यवसाय परवडत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे.
दूध पावडरचे दर प्रतिकिलो 30 रुपयांनी, तर बटरचे देखील दर प्रतिकिलो 20 रुपयांनी कमी झाले आहेत. मे महिन्यात पाऊस झाल्याने दूध उत्पादित आईस्क्रीम, दही, ताक, लस्सी आदी थंड पेयांना मागणी नाही. त्याचा साठा तसाच शिल्लक राहिला. त्यामुळे दुधाचे दर कमी झाले असल्याची माहिती दूध प्रकल्पांकडून देण्यात आली. नजीकच्या काळात अशीच परिस्थिती राहिल्यास अजून एक रुपया कमी होण्याची शक्यता दूध प्रकल्पांकडून व्यक्त करण्यात आली आहे.