वाल्हे: शासनाने जाहीर केलेल्या प्रतिलिटर अनुक्रमे पाच रुपये व सात रुपये दूध अनुदानापासून अनेक दूध उत्पादक आठ महिन्यांपासून वंचित आहेत. तसेच सात रुपये प्रतिलिटर दूध अनुदान 1 ऑक्टोबरपासून दूध उत्पादकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार होते, तेही अद्यापपर्यंत जमा झाले नसल्याने दूध अनुदानाचे आश्वासन हवेतच विरेल का? असा प्रश्न दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.
महायुतीच्या सरकारने लिटरमागे अनुक्रमे पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सप्टेंबर महिन्यांतील मंत्रिमंडळ बैठकीत नव्या निर्णयानुसार दूध संस्थांना 28 रुपये दर देण्याचा निर्णय झाला होता. तर सात रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.
सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकर्यांना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान 28 रुपये प्रतिलिटर इतका दर 1 ऑक्टोबरपासून दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर देणे बंधनकारक होते. त्यानंतर सरकार सात रुपये अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणार होते.
दूध अनुदानाच्या निकषात बदलाची धास्ती
मात्र, विधानसभा निवडणुका झाल्या. आचारसंहिता संपली तरी दूध अनुदान मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतक-यांची घालमेल सुरू झाली आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने अचानक दूध अनुदानाच्या निकषात बदल केला तर मोठा आर्थिक फटका बसेल या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत. शासनाने दूध दर वाढवून द्यावा किंवा दूध अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणीही दूध उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.
शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अनेक शेतकर्यांना मिळाले नाही. सद्यःस्थितीत पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईमुळे जनावरांचे पालन करणे जिकिरीचे होत आहे. दुधास समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने पशुपालक आर्थिक संकटात सापडत आहेत.-महादेव चव्हाण, पशुपालक, वाल्हे.
शासनाने जाहीर केलेले 1 जुलैपासूनचे प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पात्र दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. तर तपशिलात त्रुटी आढळून आल्याने काही दूध उत्पादक अनुदापासून वंचित होते. त्यांच्या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस पाच रुपये प्रतिलिटर दूध अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल. तसेच यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील सात रुपये प्रतिलिटर दूध अनुदान कात्रज सहकारी दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.- तानाजी जगताप, उपाध्यक्ष, कात्रज सहकारी दूध संघ.