मांडवगण फराटा: गेली तीन महिन्यांपासून अनेक दूध उत्पादक शेतकर्यांना अनुदान न मिळाल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी दुधाला अनुदान म्हणून सुमारे पाच रुपये प्रतिलिटर जाहीर केले होते. त्यानुसार काही दिवस हे अनुदान देण्यात आले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून शिरूर तालुक्यातील पूर्व भागात अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत.
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकर्यांना चारा समस्येला तोंड द्यावा लागत आहे. महागडा चारा घ्यावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पशुखाद्यांचे भाव वाढल्याने दूध उत्पादक शेतकर्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
फेब्रुवारी महिन्यातच अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणविण्यास सुरुवात झाली आहे. शिरूर तालुक्यात चासकमान कालव्याचे पाणीदेखील अद्याप आलेले नाही. त्यामुळे चारा पिके जळू लागली आहेत. चारा पिकांना पाण्याचा फटका बसला आहे. यामुळे दूध व्यवसाय टिकवणे अवघड झाले आहे.
याबाबत फराटे पाटील दूध संस्थांचे अध्यक्ष सचिन फराटे पाटील यांनी सांगितले की, सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांचे दुधाचे पाच रुपयेप्रमाणे अनुदान शेतकर्यांना मिळालेले नाही. सध्या उन्हाची तीव्रता पाहता दूध व्यवसाय टिकविणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासनानेदेखील लवकरात लवकर मागील अनुदान व चालूचे अनुदान जमा करावे.
मांडवगण फराटा येथील दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर फराटे यांनी सांगितले की, शेतकर्यांना अनुदान मिळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर अनुदान शेतकर्यांना वितरित करावे.