दूध दरात दोन रुपयांनी वाढ; आता गायीच्या दुध 58 रुपये, म्हशीचे दूध 74 रुपये प्रतिलिटर Pudhari
पुणे

दूध दरात दोन रुपयांनी वाढ; आता गायीच्या दुध 58 रुपये, म्हशीचे दूध 74 रुपये प्रतिलिटर

राज्यात 15 मार्चपासून होणार अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे गाय आणि म्हैस दूध दरात प्रतिलिटरला दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्चपासून करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार प्रतिलिटर गायीच्या दुधाची विक्री 56 वरून 58 रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून 74 रुपये होणार आहे. पत्रकार परिषदेस चितळे दूध पेढीचे संचालक श्रीपाद चितळे, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे उपस्थित होते.

कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी व खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस राज्यातील सहकारी व खासगी डेअरींचे एकूण 47 प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्याबाबत भेसळखोरांवर कडक करवाई करण्याची एकमुखी मागणी बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुढील आठवड्यात मुंबईत कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय दुग्ध विभागाबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री, सचिव यांनाही याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती श्रीपाद चितळे यांनी दिली.

दुबार दूधसंकलन होणार

राज्यात दुधाचे संकलन आता सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. त्यामुळे गुणवत्तापूर्ण दुधाची उपलब्धता ग्राहकांना करणे शक्य होणार असल्याची माहिती कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी दिली. याशिवाय राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेत मागील तीन ते चार महिन्यांचे लिटरला पाच रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. ते अनुदान लवकर मिळावे, अशी मागणीही बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले.

मागणी वाढल्याने पावडर, बटरची दरवाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरला मागणी वाढली आहे. देशांतर्गत बाजारातही मागणी वाढल्यामुळे पावडर व बटरच्या दरवाढीस चालना मिळाल्याची माहिती रणजितसिंह देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, उन्हाळ्यामुळे आइस्क्रीमला मागणी वाढली आहे. प्रतिकिलोस दूध पावडरचे दर 200 ते 210 रुपयांवरून 240 रुपये आणि बटरचे दर 370 ते 375 रुपयांवरून 430 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे दुधाला मागणी वाढून अलीकडे खरेदी दरात लिटरला पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT