पुणे

Milk Price Hike : राज्यात दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महागणार, ‘या’ तारखेपासून वाढीव विक्री दर होणार लागू

दुग्धजन्य उपपदार्थांच्या दरातही १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढीवर शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

पुणे : डिझेलची दरवाढ, वाढता वाहतूक खर्चाचा विचार करून गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून लागू होईल.

दुग्धजन्य उपपदार्थांच्या दरातही १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे या दरवाढीची झळ थेट ग्राहकांना बसणार आहे. दरम्यान, गाय दुधाचा विक्री दर आता लिटरला ६० वरून ६२ आणि म्हशीच्या दुधाचा विक्री दर लिटरला ७६ वरून ७८ रुपये होणार आहे.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज दूध संघात शुक्रवारी सायंकाळी झाली. त्यामध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

प्रमुख डेअरी संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

यावेळी कात्रज दूध डेअरीचे अध्यक्ष अरुण चांभारे यांच्यासह राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध डेअऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, ॲनालॉग पनीरवर बंदी आणण्यासाठी केलेल्या भरीव मदतीबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचे आभार या बैठकीत दूध उद्योगाच्या वतीने मानण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT