बावडा: दूध उत्पादनासाठी आवश्यक चारा, पशुखाद्य, वैद्यकीय सेवा, मजुरी आदींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत सध्या गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने दूध धंदा परवडत नसल्याची तक्रार दूध उत्पादक शेतकर्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटरला किमान 40 रुपये एवढा दर द्यावा, अशी मागणी पिठेवाडी (ता. इंदापूर) येथील दूध उत्पादक शेतकरी महादेव शेंडगे यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्याला पूर्वीपासूनच दुधाचे आगार म्हणून ओळखले जात आहे. तालुक्यात लाखेवाडी, पिठेवाडी या परिसरात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. दूध उत्पादक शेतकरी महादेव शेंडगे हे सन 1990 पासून म्हणजे गेली 35 वर्षे दूध व्यवसाय करीत आहे. त्यांच्याकडे 25 गायींचा गोठा आहे. (Latest Pune News)
गाईच्या दुधाला 3.5 फॅट व 8.5 सिग्नतेला सध्या सरासरी 30 रुपये प्रतिलिटर असा दर मिळत आहे. दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर समाधानकारक नसल्याने उत्पादन खर्च वजा जाता शेतकर्यांच्या हाती फक्त शेण शिल्लक राहात असल्याची सडेतोड भूमिका महादेव शेंडगे यांनी मांडली.
शेंडगे यांनी गोठ्यातील जनावरांच्या चार्यासाठी 3 एकर क्षेत्र राखून ठेवले आहे. या क्षेत्रामध्ये कडवळ, मकवान, गिनी गवत अशी चारा पिके ते वर्षभर नियोजन करून घेत आहेत. दररोज त्यांचे सुमारे 125 ते 130 लि. दूध डेअरीला जाते.
या दूध धंद्यासाठी त्यांना पत्नी सीताबाई शेंडगे, मुलगा संदीप शेंडगे यांचे सहकार्य लाभते. दिवसेंदिवस दूध उत्पादन खर्चात वाढ होत आहे. दूध धंदा किफायतशीर राहिलेला नाही, त्यामुळे गाईच्या दुधाच्या खरेदी दरात राज्य शासनाने तातडीने वाढ करावी, अशी मागणीही महादेव शेंडगे यांनी केली आहे.
उन्हाळ्यामुळे दूध उत्पादनात घट!
सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनावरांच्या चयापचय क्रियेवर झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेमध्ये सध्या घट झाली आहे. परिणामी, गोठ्यातील जनावरांचे दूध उत्पादन कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका हा दूध उत्पादक शेतकर्यांना बसल्याचे संदीप महादेव शेंडगे यांनी सांगितले.