पुणे

बावडा : दूध धंदा धरतोय पुन्हा बाळसे!

अमृता चौगुले

राजेंद्र कवडे देशमुख
बावडा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर दुग्ध व्यवसाय पुन्हा बाळसे धरत असल्याचे चांगले चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या दुभत्या जनावरांना मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, गाईच्या दुधाला प्रतिलिटरला 40 रुपये दराची मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला होता. त्यामुळे नाइलाजाने अनेक शेतकर्‍यांना गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करावी लागली. परिणामी, अनेक दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले होते. कोरोनाच्या काळामध्ये 60 ते 65 हजार रुपये किमत असलेल्या गाईला आता तब्बल 1 लाख रुपयांच्या पुढे मागणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून गाईच्या दुधाला प्रतिलिटरला सुमारे 35 रुपयांप्रमाणे दर मिळत असून, वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर पुरेसा नाही. त्यामुळे प्रतिलिटरला 40 रुपये दर आवश्यक असल्याची मागणी प्रसिद्ध दूध उत्पादक शेतकरी राजेंद्र देवकर (रेडा) यांनी केली आहे.

उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या
गेली तीन-चार दशकांपासून दूध धंद्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलले आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीमध्ये दूध धंद्याचा मोलाचा वाटा आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. पशुखाद्य, औषधे, वाळलेला व हिरवा चारा, मुजरांचा खर्च, विमा यामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकर्‍यांना दूध धंदा फारसा किफायतशीर राहिलेला नाही. शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायातून चांगला आर्थिक आधार प्राप्त होण्यासाठी दूध उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव शासनाने जाहीर करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून सातत्याने केली जात आहे.

SCROLL FOR NEXT