पुणे: राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणार्या शालेय पोषण आहारात विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने एक शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार शाळास्तरावर आहार तयार केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक अथवा स्वयंपाकी मदतनीस तसेच पालक उपस्थित असल्यास त्यांच्यामार्फत चव घेण्यात यावी व दर्जा तपासावा तसेच त्याचा अभिप्राय नोंदवहीत नोंदविण्यात यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे दिल्या आहेत.
शासनाच्या आदेशानुसार शाळेत अन्नविषबाधेची घटना घडल्यास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांना विशिष्ट कार्य जबाबदार्या नेमून दिल्या आहेत. स्वयंपाकाच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (Latest Pune News)
शाळांमध्ये वितरित अन्नाची गुणवत्ता तपासणे व नमुने 24 तास ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या जेवणाची चव आधी शिक्षक, स्वयंपाकी, पालक तपासणार आहेत.
अन्नधान्य, मसाले आदी साहित्य मएक वर्ष शिल्लक मुदतीचेफ असणे आवश्यक आहे. हात स्वच्छ धुऊनच अन्न हाताळणे, साबण, स्वच्छ पाणी उपलब्ध असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेवणानंतर उलटी, जुलाब, ताप यांसारखी लक्षणे दिसली तर तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणेआवश्यक आहे.
पुरवठादारांकडून आलेल्या धान्याची गुणवत्ता चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याला धान्याचा नमुना तपासला जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.