लोणी-धामणी आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडील आठ गावे, सातगाव पठार तसेच शिरूरमधील पाबळ व परिसरातील गावे पाण्यापासून वंचित असल्याने त्यासाठी म्हाळसाकांत योजनेचा सुधारित आराखडा व सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. दिलीप वळसे पाटील आणि मी या गावांचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.
नुकत्याच मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आदिवासी भागातील फुलवडे, बोरघर, कळमजाई या पाणी उपसा सिंचन योजनांबरोबर या योजनेवरही चर्चा झाल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.
पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री अंबिकामाता उत्सवानिमित्त माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्थानिक विकास (आमदार) निधीतून ग्रामदैवत अंबिकामाता मंदिर सभामंडप (25 लाख रुपये) तसेच ठाकरवाडी (पहाडदरा) येथील श्री भैरवनाथ मंदिर सभामंडपाच्या (20 लाख रुपये) भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश स्वामी थोरात, उपसभापती सचिन पानसरे, मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, तालुका पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले, भीमाशंकर कारखाना संचालक शांताराम हिंगे, प्रमोद वळसे पाटील, बाळासाहेब मेंगडे, सागर जाधव, सरपंच मच्छिंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रशांत लोंढे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.