पुणे: स्वारगेट - कात्रज मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे पद्मावती येथील शंकर महाराज समाधिस्थळाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, असे स्पष्टीकरण महामेट्रोकडून देण्यात आले आहे. तरी या ठिकाणी होणारे मेट्रो स्थानक भाविकांसाठी सोईचे होईल, असेही महामेट्रोने म्हटले आहे.
स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोचा भुयारी मार्ग शंकर महाराज मठाजवळून जात आहे. या ठिकाणी आता महामेट्रोचे एक स्थानकही होणार आहे. मात्र, मेट्रोच्या या कामांमुळे शंकर महाराजांच्या समाधिस्थळाला धक्का पोहचेल अशी भीती भक्तांकडून व्यक्त करण्यात येत होती.
याबाबत भाजपचे माजी नगरसेवक ही बाब महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांच्याकडे पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. तसेच, येथील मेट्रो स्थानकाला शंकर महाराज समाधी महाराज मंदिर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती.
त्यानुसार महामेट्रोच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार शंकर महाराज समाधी मंदिरापासून जाणार्या मार्गात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे समाधिस्थळालाही कोणतीही हानी पोहचणार नाही, असे महामेट्रोचे संचालक गाडगीळ यांनी शिळीमकर यांना पत्राद्वारे कळविले आहे.